गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस
चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर आगारात असणाऱ्या बसेस या खुप जुन्या असून गेली १०-१२ वर्ष या आगारासाठी नवीन बसेस पुरविण्यात आलेल्या नाहीत. आता आगारात असणाऱ्या बसेस या खुप जुन्या झाल्या असून त्या वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. अनेक बसेस गळक्या असून पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. तात्पुरती डागडुजी करून प्रवाशांची गरज भागवली जाते. हे लक्षात घेऊन गुहागर आगाराला १५ नव्या गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी शिवसेना नेते, मतदारसंघाचे आमदार श्री भास्करराव जाधव यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री ना. श्री. प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. यासंबंधीचे पत्र आमदार श्री. जाधव यांनी देताच ना. श्री. सरनाईक यांनी ही मागणी मान्य करून तत्काळ संबंधितांना निर्देश दिले.
मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आज आ. श्री. जाधव यांनी ना. सरनाईक यांची भेट घेतली.त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या आणि जुन्या झालेल्या वातानुकूलित शिवशाही बस बंद करून शिवाई, शिवनेरी यासारख्या नव्या गाड्या द्याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली. तीदेखील ना. सरनाईक यांनी मान्य केली.
