चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून चिपळूण शहर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन, विहिरी नद्या साफसफाई, जल पुनर्भरण, पाणपोई, बंधारा उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात
येतात.या प्रतिष्ठानच्या सौजन्याने रविवार दिनांक २ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता चिपळूण शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले ‘स्वच्छता दूत’ डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.या शहर स्वच्छता अभियानामध्ये चिपळूण शहरासोबत महाराष्ट्रातील तसेच देशात व परदेशात देखील विविध शहरांमध्ये हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या शहर स्वच्छता अभियानामध्ये सावर्डे, पाचाड, धामनंद वावे, अलोरे, लवेळ, सती येथील श्री बैठक मधील हजारोच्या संख्येने सर्व श्री सदस्य सहभागी होणार आहेत. तरी या स्वच्छता अभियानामध्ये प्रतिष्ठानच्या वतीने आपणा सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपणही या शहर स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे.या स्वच्छता अभियानामध्ये शहरातील सर्व प्रमुख रस्ते व शासकीय कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे तसेच या अभियानामध्ये सर्व शासकीय कर्मचारी यांनी देखील सहभागी व्हावे असे प्रतिष्ठानच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.
