अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने लोटे परिसरात उद्योजकता अभियान
चिपळूण (ओंकार रेळेकर) तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल लिमिटेड कंपनीने दिव्यांगांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लोटे आणि परिसरातील १५ गावांमधील दिव्यांगांसाठी उद्योजकता अभियान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन बेहेरे महाविद्यालय, लवेल येथे कंपनीचे जनरल मॅनेजर धीरज जाधव, सीएसआर प्रमुख बापूराव पवार, आणि अन्नपूर्णा संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत झाले.
दिव्यांगांसाठी रोजगार, व्यवसाय निवड, प्रशिक्षण, आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. यासाठी परिसरातील १५ गावांतील दिव्यांगांची सर्वेक्षणाद्वारे निवड करण्यात आली. यामध्ये ७० पेक्षा अधिक दिव्यांगांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमात दिव्यांग उद्योजक राजेंद्र किजबिले आणि ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा आंब्रे यांनी संघर्षमय प्रवास उलगडला. प्रवीण प्रशिक्षक विद्याधर गायकवाड आणि राजेश जाधव यांनी दिव्यांगांच्या हक्क, योजना आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमात दिव्यांगांसाठी विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आणि चालण्यासाठी काठ्या वितरित करण्यात आल्या.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रवीण पठारे आणि सूरज मस्के यांनी केले.दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी हा अभियान पुढील काळात महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
फोटो : दिव्यांगांसाठी विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करतांना मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)