संगमेश्वर : तालुक्यातील कडवई परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कडवई कुंभार वाडीतील निलेश कुंभार यांच्या घराजवळ असलेल्या खुराड्याची जाळी तोडून तीन कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. कडवई किंजळकर वाडीतील तरुण घराकडे परतत असताना रस्त्याच्या बाजूला त्यांना बिबट्याचे दर्शन झाले परंतु प्रसंगावधान दाखवत या तरुणांनी दुचाकीवरून पळ काढला.
मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता कडवई येथील घोसाळकर कोंडचे रहिवासी संजय घोसाळकर आपल्या काजु बागेत फेरफटका मारायला गेले असताना त्या ठिकाणी नवीन तयार होत असलेल्या पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी बिबट्या दिसून आला. संजय घोसाळकर यांनी बिबट्याला पाहताच बिबट्या उडी मारून जंगलात पसार झाला.
चिखली बाजारपेठेजवळ असणाऱ्या नदीच्या मोरीजवळ पाणी प्यायला आलेला बिबट्या अनेक ग्रामस्थांनी पहिला आहे. त्यामुळे संध्याकाळी घराबाहेर पडायला नागरीक घाबरत आहेत. कडवई मुस्लिम मोहल्ल्यातील निहाल खान यांच्या घरापाठीमागे बिबट्या ठसे आढळून आले आहेत.
देवरूख परिक्षेत्राचे वनाधिकारी तौफिक मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या ज्या ठिकाणी बिबट्या दिसून आला आहे त्या ठिकाणी भेट देऊन उपाययोजना केली जाणार आहे असे सांगितले. कडवई पंचक्रोशीत सर्वत्र बिबट्याचा संचार दिसून येत असल्याने लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.