रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा गजर करीत रत्नागिरीत दीड दिवसाच्या तब्बल बारा हजार गणरायांना भाविकांनी निरोप दिला. रत्नागिरीच्या भाट्ये व मांडवी समुद्रकिनार्यासह ग्रामीण भागातील नद्यांवर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात पाच ठिकाणी सार्वजनिक गणरायांना निरोप देण्यात आला.
फुलांची उधळण करीत, ढोल ताशांच्या गजरात जिल्ह्यात 11 हजार 803 घरगुती गणरायांना निरोप देण्यात आला तर 5 सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात खेडमध्ये 2, दापोली, लांजा व चिपळूण येथे एका सार्वजनिक गणरायांना निरोप देण्यात आला.
रत्नागिरीत मांडवी व भाट्ये समुद्रकिनार्यांसह तालुक्यातील ग्रामीण भागामध्येही पोलीस यंत्रणेने विशेष दक्षता घेत, बंदोबस्त ठेवला होता. पोलीस पाटलांकडून याबाबत विसर्जन मिरवणुकांची माहिती घेतली जात होती. शांततेत व सुरक्षितपणे गणरायांना निरोप देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन प्रयत्न सुरु होते. रत्नागिरीत सायंकाळी वरुण राजाचे आगमन झाल्याने अनेकांनी स्वत:च्या वाहनांमधूनच विसर्जनस्थळी नेऊन गणरायांना निरोप दिला.